मला मागचा रस्ता
स्वच्छ दिसतो आहे
जीवना -
कसा भेटलास समंजसपणे
की माशावरून पाणी
अलगद मागे जावं...
असं दिलंस सहजपणे
जसं पालवत्या पानानं
हिरवंच असावं...
शिरले अशी सहज तुझ्यात
जसं पावसाळी ढगानं
दरीच्या कुशीत शिरावं...
छातीच्या घुमटात
बांधल्याच नाहीस कधी
आशाळभूत राहुटया...
नि नजरेच्या टप्प्यात
कधी ओवल्याच नाहीस
निरर्थक भरार्या...
उचललेस माझे बाहू
तेही शुभंकर मुद्रेत...
अडवलेस पाय
ते देखील
धावत्या रस्त्यावर नव्हे
तर दरीच्या कडयाशी
जसे घरंगळते
मोती थोपवावेत...
कोसळले तीही जलप्रपाताप्रमाणे
की ज्याचा आवेग
हेही भूषण ठरावं...
विझले तीही मनस्वी वणव्याप्रमाणे
की ज्याचं श्रेय
कुणालाही घेता न यावं...
आणि वाहत राहिले
प्राणातल्या ऊर्ध्वगामी प्रेरणेसारखी
की नजरेत आभाळच साठत जावं...
म्हणून म्हणते जीवना -
जेव्हा मस्तकावर पसरला आहे
तुझ्या करुणेचा घनव्याकुळ संधिप्रकाश
मला पुढचा रस्ता
स्वच्छ दिसतो आहे...
Kid's club Public English School, Shiradhon-9922031231
No comments:
Post a Comment